

Chief Minister Medical Relief Fund Maharashtra: A Lifeline for Economically Weaker Patients
नंदुरबार : आधुनिक वैद्यकीय उपचारांची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली असताना, गरीब रुग्णांना जीवदान देणारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना ही सरकारने समाजातील शेवटच्या घटकाला दिलेली आधाररेषा आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना या योजनेचा लाभ होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जानेवारी 2025 ते जून 2025 या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण 27 रुग्णांना 27 लाख 5 हजार रुपयांची मदत मिळाल्याची माहिती मदत कक्षाने दिली आहे. या योजनेंतर्गत उपचारासाठी दिलेली रक्कम ही केवळ आर्थिक मदत नाही, तर एखाद्याच्या जीवनातील अंध:कार दूर करणारा प्रकाश आहे.
सामान्यतः वैद्यकीय योजना म्हणजे विमा आधारित सेवा, ज्यात अनेक अटी असतात. मात्र काही रुग्ण अशा योजनांच्या कक्षेबाहेर राहतात. कधी उत्पन्नाच्या अटीमुळे, कधी वैद्यकीय प्रक्रियेच्या स्वरूपामुळे. अशा गरजू रुग्णांसाठीच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्य करते.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.60 लाखांपेक्षा कमी असावे
अर्जदाराने महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना किंवा धर्मदाय रुग्णालय योजनाचा लाभ घेतलेला नसावा
या योजनेद्वारे 20 गंभीर व खर्चिक आजारांवर वैद्यकीय मदत दिली जाते. त्यामध्ये:
कॉकलियर इम्प्लांट (वय 2-6 वर्षे)
कर्करोग (शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी)
हृदय, यकृत, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपण
मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस
नवजात बालकांचे आजार, बालशस्त्रक्रिया
रस्ते अपघात, बर्न केसेस, विद्युत अपघात
हिप आणि गुडघ्याचे रिप्लेसमेंट, अस्थिबंधन इ.
योजनेतून प्रत्येक आजारासाठी दिली जाणारी रक्कम वेगवेगळी असून, वैद्यकीय खर्चाच्या आवश्यकतेनुसार ती निश्चित केली जाते.
रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी https://cmrfmaharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून, आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात ई-मेल किंवा पोस्टने सादर करावा.
रुग्णाचे व कुटुंबाचे आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार कार्यालय)
रेशनकार्ड
आजारावरील निदान व उपचार खर्चाचे प्रमाणपत्र
रुग्णालयाचे वैद्यकीय रिपोर्ट्स
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी व एफआयआर (MLC व FIR)
प्रत्यारोपणासाठी झेडटीसीसी (ZTCC) किंवा शासन मान्यतापत्र
“हिप रिप्लेसमेंट” शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत एक लाख रुपयांची मदत मिळाली. ही योजना म्हणजे आमच्यासारख्या गरीबांसाठी संजीवनी आहे. या मदतीमुळे माझे शस्त्रक्रिया योग्य वेळेत झाली आणि मला पुन्हा चालता येऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मी हृदयपूर्वक आभार मानतो. अशा असंख्य रुग्णांनी या योजनेद्वारे नवा श्वास घेतलेला आहे.
पंकज भिका भोई, नवापूर तालुका, नंदूरबार.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळालेली एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act) मान्यता ही एक क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे आता परदेशातून येणाऱ्या निधीचे कायदेशीररित्या स्वीकार करता येणार असून, त्या रकमेतून अधिक गुणवत्तापूर्ण सेवा व उपचार उपलब्ध करून देता येणार आहेत.
गरजू नागरिकांनी तात्काळ कागदपत्रांसह अर्ज दाखल करून या योजनेंतर्गत लाभ घेण्याचे शासनाकडून आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी https://cmrfmaharashtra.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे शासनाकडून कळविण्यात आले आहे.