

International Film Festival Winner
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात चित्रित झालेल्या ‘मोकी’ या आदिवासी भाषेतील लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या १६ व्या पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल-२०२६ मध्ये या लघुपटाला ‘बेस्ट इंडियन रायटर’ पुरस्कार प्राप्त झाला असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे कौतुक होत आहे.
लेखक व दिग्दर्शक दिपक शंकर ईशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लघुपटात आदिवासी, अहिराणी आणि मराठी या तीन भाषांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. लघुपटात नंदुरबारचे रणजित राजपूत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून त्यांच्या अहिराणी भाषेतील संवादांना विशेष दाद मिळत आहे. शहादा तालुक्यातील निसर्गरम्य परिसर, दरा भागातील हिरवागार निसर्ग आणि आदिवासी जीवनशैलीचे वास्तव चित्रण या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचले आहे.
नोव्हेंबर महिन्यात शहादा तालुक्यातील दरा परिसरात सलग दोन ते तीन दिवस या लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. आदिवासी कुटुंबातील व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व आणि साक्षरतेविषयी जनजागृती हा या लघुपटाचा मुख्य विषय आहे. प्रभावी कथा, संवाद आणि वास्तववादी मांडणीमुळे ‘मोकी’ प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
चित्रपटात कृतिका संगिता, शितल चव्हाण, रुपेश जाधव, रणजित राजपूत, सुरेश अंतुर्लीकर, हितेश ईशी, सागर वाडिले, नंदिनी जाबुके, स्वप्नील लखनगीरे आणि जिविका नवलसिंग राजपूत यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सर्व कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे.
चित्रपटाचे छायांकन पवनकुमार धावरे यांनी केले असून संपादन गजानन बुधेवड, संगीत रोहित नागभिडे, ध्वनी संयोजन निखिल लांजेकर, ध्वनीमुद्रण चंदन पटेल, रंगसंगती देवा आव्हाड यांनी काम पाहिले आहे. स्वप्नील लखनगीरे यांनी सहाय्यक निर्माता, तर शैलेश सदावर्ते आणि साहिल बजबलकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
पुण्यातील बाळासाहेब कला दालन येथे झालेल्या महोत्सवात अमेरिका, लंडन, बंगाल, महाराष्ट्रासह विविध भागांतील लघुपट सहभागी झाले होते. प्रशासनाची अनास्था, शेतकऱ्यांच्या समस्या, बालकांविषयी जागृती, शिक्षण आणि गरिबी यांसारख्या विषयांवर आधारित चित्रपट सादर करण्यात आले. या महोत्सवात एकूण २४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
‘मोकी’ या लघुपटाला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-२०२७ मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट (Best Short Film) विभागासाठी नामांकन मिळाले आहे. तसेच सिट्टन्नवासल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-२०२६ (तामिळनाडू) येथे सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट, सर्वोत्कृष्ट महिला-केंद्रित लघुपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
याशिवाय अथ्विकवरुणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-2026 (तामिळनाडू) मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई लघुपट आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण लघुपट हे पुरस्कार मिळाले आहेत. इंडियन डायव्हर्सिटी इंटरनॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड्स-2026, कोलकाता येथेही सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट हा मानाचा पुरस्कार ‘मोकी’ने पटकावला आहे.
विशेष म्हणजे, रणजित राजपूत यांच्या अहिराणी भाषेतील संवादांसह प्रमुख पात्रांच्या तोंडी असलेले आदिवासी संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. लेखन, दिग्दर्शन, संवाद, छायांकन आणि आदिवासी-अहिराणी भाषेचा प्रभावी वापर यामुळे ‘मोकी’ला देश-विदेशातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या यशामुळे दिग्दर्शक दिपक ईशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नंदुरबार जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होत आहे.