HMPV Virus | एच.एम.पी.व्हायरसला घाबरु नका : अधिष्ठाता डॉ. संजय राठोड

Grant Government Medical College :
Human metapneumovirus Virus HMPV आरोग्य यंत्रणा अलर्ट
Human metapneumovirus Virus HMPV आरोग्य यंत्रणा अलर्ट Pudhari News Network
Published on
Updated on

नंदुरबार - ह्यूमन मेटा न्युमो व्हायरस (एच.एम.पी.व्ही) हा कोणताही नवीन आजार नसून 2001 पासून प्रचलित आहे. हा सौम्य स्वरूपाचा हंगामी आजार असून यामुळे सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. राठोड यांनी सांगितले की, हा विषाणू हिवाळा व वसंत ऋतूमध्ये जास्त प्रमाणात सक्रिय होतो. लहान मुले, वृद्ध, तसेच कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना या विषाणूचा धोका अधिक असतो. मात्र, सद्यस्थितीत भारतात श्वसन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक नाही.

डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले की, एच.एम.पी.व्ही हा साधारण सौम्य आजार असून तो इन्फ्ल्यूएंझा किंवा आर.एस.व्ही (Respiratory Syncytial Virus) यासारख्या विषाणूंप्रमाणेच आहे. हा आजार नवीन नसून जगभरातील अनेक देशांमध्ये यापूर्वीच नोंदला गेला आहे. या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असली, तरी लहान मुले आणि वृद्धांसाठी तो अधिक हानिकारक ठरू शकतो.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या आजाराच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे येथे या विषाणूची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या आजारासाठी कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषध सध्या उपलब्ध नाही. उपचार लक्षणांवर आधारित केले जातात. ताप, सर्दी, खोकला यांसाठी योग्य औषधोपचार केले जातात. प्रतिजैविके (antibiotics) या आजारावर प्रभावी नाहीत. नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.

श्वसन संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळा; यांचे पालन करा

  • खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यूने झाकावे.

  • वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

  • ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.

  • आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.

  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.

  • घरातील आणि सार्वजनिक ठिकाणची हवा खेळती राहील, याची खात्री करावी.

  • भरपूर पाणी प्यावे आणि पोषक आहार घ्यावा.

“आरोग्य हीच आपली जबाबदारी आहे,” नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. “आपली स्वच्छता आणि आरोग्य ही संसर्ग टाळण्याची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत,” नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि फक्त आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचना पाळायला हवेत. लहान मुले, वृद्ध, तसेच कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. कोणत्याही लक्षणांसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य उपचार घ्यावेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news