

नंदुरबार : भाजप महायुतीचे उमेदवार मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ग्रामीण भागात कॉर्नर सभा घेऊन प्रचाराची उंची गाठलेली असतानाच नंदुरबार शहरातही आपल्या झंझावती प्रचार फेऱ्यांना सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 9) प्रभाग 3 व 4 मधील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांनी प्रचार फेरी काढली असता, प्रत्येक कॉलनीत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शहरातील प्रमुख वळण रस्त्यावरील डॉ. विक्रांत मोरे यांच्या कार्यालयापासून या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. अमर कॉलनी, सूरज केसरी कॉलनी, बन्सीलालनगर, म्हाडा कॉलनी, सरगम कॉलनी, दत्त कॉलनी, विमलविहार सोसायटी, भुवनेश्वर कॉलनी, पटेलवाडी, स्वामी समर्थ कॉलनी, गिरीविहार सोसायटी अशा विविध भागांतून त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समवेत भाजप तालुकाध्यक्ष जे. एन. पाटील, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्याम बापू मराठे, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, नीलेश चौधरी व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी होते.
डॉ. विजयकुमार गावित यांच्या 30 वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा कसा विकास झाला, यावर चौकाचौकातील नागरिक मते- मतांतरे मांडताना दिसतात. वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या राबवलेल्या योजना महाराष्ट्रभर चर्चेत राहिल्या. स्थानिक शेतकऱ्यांना मिळवून दिलेली वीजमाफी, पीकविमा योजना, कृषी साहाय्य, तापी बुराई आणि तत्सम पाणी प्रकल्पांना दिलेली गती, महिला बचतगटाच्या माध्यमातून गावागावांत सुरू झालेले गृह उद्योग, ठक्कर बाप्पासारख्या योजनांमधून प्रत्येक गावात झालेले रस्ते आणि काँक्रिटीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या सवलती, भांडेवाटप सुरक्षा संच वाटप आणि लाडकी बहीण योजनेचे लाभ अशा अनेक कामांमुळे डॉ. विजयकुमार गावित यांचे नेतृत्व ठळक राहिले आणि हाच मुद्दा सध्या निवडणूक रणधुमाळीत चर्चेचा झाला आहे.