नंदुरबार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा फोटो छापलेला टी-शर्ट घातल्यावरून नांदरखेडा गावातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात 3 जण जखमी झाले असून दोन्ही गटांनी परस्पर विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून 11 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी बाळु चंदु बंजारा वय ३१ वर्ष धंदा शेती रा. नांदरखेडा, ता. नंदुरबार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचा फोटो छापलेला टिशर्ट बाळू बंजारा याचा चुलत भाऊ कृष्णा जवाहरलाल राठोड याने घातला होता म्हणून हिरामण पवार यांनी हटकले आणि विरोध केला. तुला पण शर्ट मिळेल तू पण घाल, असे सांगून बाळू बंजारा यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्याचा राग आल्याने सामूहिक मारहाण करण्यात आली. लोखंडी सळईने डाव्या कपाळावर डोळयाचे खाली नाकावर मारुन दुखापत केली. तसेच भाऊ नाना चंदु चव्हाण यास उजव्या हातावर लाकडी काठीने व हाताबुक्यांनी मारहाण केली आहे. फिर्यादी यांचे घराच्या लोकांना धक्काबुक्की करुन वाईट वाईट शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात हिरामण आलु पवार, आलु गरदाल पवार, अनिल सुदाम चव्हाण, अर्जुन सुदाम पवार, सुनिल आलु पवार सर्व रा. नांदरखेडा जि. नंदुरबार या पाच जणांनी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक पाटील अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान याच प्रकरणी दुसऱ्या गटाकडून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात मात्र शेताच्या बांधावरून वाद झाल्याचे कारण नोंदवले आहे. वरील आरोपीच्या बाजूने अर्जुन चव्हाण यांनी देखील फिर्याद नोंदवली असून त्यात म्हटले आहे की, शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली तसेच भांडण सोडविण्यासाठी गेला असता लोखंडी पान्याने फिर्यादीच्या कपाळाच्या वर मारुन दुखापती केली. म्हणून किसन जवाहरलाल राठोड, एकनाथ, कांतीलाल राठोड, जवाहरलाल धर्मा राठोड, मनिलाल विरजी राठोड सर्व रा. नांदरखेडा ता. जि. नंदुरबार यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.