

विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संपर्कप्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवले जाणार आहे. धुळे- नंदुरबार जिल्हा परिषदेचे दोनदा अध्यक्ष आणि तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या रघुंवशी यांना दिलेल्या या संधीमुळे नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी शिवसेनेचे दोन आमदार दिसणार आहेत.
नंदुरबार - एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रघुवंशी समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून आणि एकमेकांना पेढे भरवून एकच जल्लोष केला. सुमारे नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होणार आहे.
याच्या आधी काँग्रेस पक्षात असताना धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून लागोपाठ दोन वेळेस चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्या माध्यमातून बारा वर्षे ते आमदार होते. नंतर साडेचार वर्ष थांबावे लागले तथापि आमदारांमधून निवडून येत पुन्हा ते विधान परिषद सदस्य बनले होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरे शिवसेनेत असताना राज्यपाल यादीला स्थगिती मिळण्याचा प्रकार घडला तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेत आले तेव्हा पक्षाने अक्कलकुवा येथील आमशा पाडवी यांना विधान परिषद सदस्यत्व दिले. अशा घटनाक्रमामुळे 2019 पासून विधान परिषद सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी त्यांना सलग प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, शिंदे गटातील विधान परिषद सदस्य आमशा पाडवी हे नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले. त्या रिक्त झालेल्या जागेवर आता चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लागली असून या पदाची मुदत तीन वर्षे राहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रघुवंशी समर्थकांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.
तीन आठवड्यांपूर्वीच विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात शिवसेनेच्या वाट्याला १ जागा होती. या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. तथापि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिली. सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबारात सेना भवन परिसरात समर्थकांनी जल्लोशोत्सव साजरा केला. महत्त्वाचा संदर्भ असा की, शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते. म्हणून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडगावच्या प्रचार सभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार करू असा जाहीर शब्द दिला होता. आमश्या पाडवी यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, तुम्हाला दुसरा आमदार देऊ; असे शिंदे म्हणाले होते. त्या जाहीर दिलेल्या वचनाची पूर्ती होत असल्याचे स्थानिक कार्यकर्ते म्हणाले.
सकाळी ११ वाजता सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जमा झाल्यानंतर नंदुरबार येथील सेना भवन परिसरात ढोल ताशांच्या गजर अन फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढा भरवला. जिल्हाप्रमुख अॅड. राम रघुवंशी, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे, माजी जि.प सदस्य देवमन पवार, किरण रघुवंशी, कुणाल वसावे, गजेंद्र शिंपी, रवींद्र पवार, पत्रकार हिरालाल चौधरी, किशोर पाटील, नवीन बिर्ला, मोहितसिंग राजपूत, जगन माळी, किरण चौधरी, विजय माळी यांनी सहभाग घेतला.