नंदुरबार : शहादा येथे 33 लाखाचा अवैध दारू साठा जप्त; पोलीस दलाकडून पुन्हा दणका | पुढारी

नंदुरबार : शहादा येथे 33 लाखाचा अवैध दारू साठा जप्त; पोलीस दलाकडून पुन्हा दणका

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहादा पोलिसांनी सापळा रचून 33 लाख 60 हजार रुपये किमतीची बनावट दारु अवैधरित्या बाळगून चोरटी वाहतूक दोन जणांच्या मूसक्या आवळल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचा धडाका सुरूच ठेवला असून आज झालेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना आणखी एक दणका बसला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यावर शहादा येथील शहादा-दांडाईचा रोडवरील संविधान चौक येथे दिनांक 10/04/2024 रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान दोंडाईचा कडून शहादयाचे दिशेने एक पांढ-या रंगाची टाटा कंपनीचे वाहन दिसले. ते वाहन थांबवून वाहन चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अज्जू खान रशिद खान, वय 27 वर्षे, रा. खडकपाणी ता. कसरावद जि. खरगोन राज्य- मध्यप्रदेश असे तर, क्लीनरने त्याचं नाव मोहम्मद मेहफूज मोहम्मद लियाकत शहा, वय 25 वर्षे, रा. पनाह नगर, बुराई, मिया कापूरवा ता. कुंडा प्रतापगड जि.प्रतापगड राज्य- उत्तरप्रदेश असे सांगितले. त्यांना वाहनातील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी पोलीसांना चुकीची माहिती दिली. त्यावरुन संशय आल्याने संबंधित वाहन तपासले असता त्यामध्ये एकूण 33 लाख 60 हजार रुपये किमतीच्या अवैध बनावट दारुचे एकूण 500 बॉक्स मिळुन आले. चालक अज्जू रशिद खान व क्लीनर मोहम्मद महेफूज मोहम्मद लियाकत शहा यांनी हा साठा अहमदनगर येथील व्यक्तींकडून गाडीसह ताब्यात घेतला असल्याचे सांगितले. व सदरचा माल एका अज्ञात व्यक्तीला (नाव गाव माहित नाही) देण्यात येणार होता, असे तपासणीतून निष्पन्न झाल्याने सदरचा अवैध बनावट दारुचा साठा कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केला व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चोरटी वाहतूक करणेसाठी वापरण्यात आलेले वाहन देखील जप्त करण्यात आले असून पुढील अधिक तपास सुरू आहे.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, पोउपनि-छगन चव्हाण, पोशी-दिनकर चव्हाण, पोशि-अनमोल राठोड, पोशि- मुकेश राठोड, पोशि- विकास शिरसाठ, पोशि- राकेश मोरे असे शहादा पोलीस ठाण्याचे पथकाने केली आहे.

Back to top button