

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेत विविध कार्यकारी सोसायटीच्या ८९ सभासदांच्या नावाने तयार केलेल्या खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर पीक कर्ज मंजूर करुन घेत २ कोटींचा अपहार करण्यात आला. ही बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पीक कर्ज परस्पर मंजूर करून घेण्याचा अजब फंडा अपहारकर्त्यांनी वापरलाच शिवाय बनावट तयार केलेल्या रुपे के. सी. सी. कार्डचा सुद्धा बिनधास्त आणि सर्रास वापर केल्याचे या प्रकरणात आढळून आले आहे. याप्रकरणी आज (दि.१०) तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२००९ ते २०२२ या कालावधीत हा अपहार करण्यात आला. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोदा शाखेत साखळी पद्धतीने घडवल्या गेलेल्या या अपहारप्रकरणी कागदी पुरावे समोर आल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत यावर निर्णय करण्यात आला तसेच ठराव संमत करून कारवाईचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि व्यवस्थापकीय संचालक धर्मेंद्र चौधरी यांच्या आदेशान्वये बँकेचे विभागीय अधिकारी अनंत मदन ठाकुर शिरपुर विभाग (तत्कालिन विभागीय अधिकारी तळोदा विभाग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अपहाराचा आरोप असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी काही प्रमाणात अपहरित रक्कम जमा केली असून एक कोटी पन्नास लाखाहून अधिक रक्कम जमा होणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे.