

जळगाव : जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणण्यात येते. कारण शिक्षण, आरोग्य, सिंचन, बांधकाम अशा ग्रामीण भागाशी संबंधित महत्त्वाच्या सेवा याच संस्थेच्या माध्यमातून दिल्या जातात. इतक्या महत्त्वाच्या यंत्रणेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लावण्यात आली आहे. मात्र सध्या ही यंत्रणा निष्क्रिय झाल्याचे समोर आले असून, त्याचा वापर गेले कित्येक महिने झालेलाच नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उपविभागीय बांधकाम विभागाच्या कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन विजेपासून अलग करून केवळ तशीच टांगून ठेवलेली आहे. इतकेच नव्हे तर, मशीनमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून एकाही कर्मचाऱ्याची हजेरी नोंदलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली तरी कशी जाते? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या संदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, “कार्यालयातील आणि आमच्या अधिपत्याखालील इतर उपविभागातील बायोमेट्रिक यंत्रणा सध्या बंद आहेत. यासंदर्भात माहिती घेऊन तपासून सांगतो,” असे उत्तर त्यांनी दिले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या इतर विभागांमध्ये लावण्यात आलेली बायोमेट्रिक यंत्रणा ‘एम-100’ प्रकारातील आहे. या यंत्रणेत 100 टक्के सिक्युरिटी मिळत नसल्याने संबंधित कंपनीने यंत्रणा बंद केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. सोमवार (दि.2) पासून त्या सेन्सरचे 'अपडेशन' सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात यंत्रणा कित्येक महिन्यांपासून निष्क्रिय असून, यामागे अपडेशनची सबब देत अधिकाऱ्यांकडून केवळ परिस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचे कारण समोर येत आहे.