

जळगाव : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी मंगळवारी (दि.6) रोजी दुपारी 4.40 वाजता जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील काही तासांत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी (दि.6) रोजी दुपारी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जळगाव शहर, भुसावळसह अनेक भागांत झाडे पडली असून महावितरणचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वीज सेवा बुधवारी (दि.7) रोजी दुपारी बारा वाजता पूर्ववत होईल.
जिल्हा प्रशासनाने पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व आरोग्य सेवा यांना तातडीने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आले आहेत.
विजेच्या कडकडाटानंतर घराबाहेर पडू नये.
मोकळ्या मैदानात असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
उंच झाडांखाली, लोखंडी तंबूंखाली किंवा पाण्याजवळ थांबणे टाळावे.
"जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज आहे, मात्र नागरिकांनीही जबाबदारीने वागून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी," असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.