

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून (दि.5) मंगळवार (दि.6) जी अवकाळीने हजेरी लावत गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह थैमान घातले आहे. सोमवार (दि.5) रोजी चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यात गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, तीन म्हशी, एक गाय वीज पडून मृत्युमुखी पडल्या तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अवकाळीमुळे एकूण 102.70 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
सावरखेडा तुर्क येथील नाना पाटील यांच्या गुरावर वीज पडून मृत्यू झाला, तर पारोळा तालुक्यातील उदिरखेडे येथील शांताराम आनंदा सौंदाणे हे वीज पडून जखमी झाले आहेत. जामनेर तालुक्यातील विजय किसन परदेशी यांच्या तीन म्हशींवर वीज पडून त्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
अवकाळीमुळे शेवगा, मका, बाजरी, भाजीपाला, कांदा, केळी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण 11 गावे बाधित झाली असून, 262 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 40 हेक्टरवरील मका, 43 हेक्टरवरील कांदा, 4.30 हेक्टरवरील केळी, 8 हेक्टरवरील बाजरीसह इतर पिके प्रभावित झाली आहेत.
मंगळवार (दि.6) रोजी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास जळगाव शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. यावेळी गारपीटही झाली. चाळीसगाव, जळगाव व भुसावळ या भागांतही पावसाने हजेरी लावली.
उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमान 43-44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरीकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.