FDA Raid Jalgaon | दिवाळीपूर्वी जळगावात FDA चा छापा; अहमदाबादहून आलेला २४० किलो संशयित खवा जप्त

६५ हजारांचा साठा ताब्यात; खवा कोणत्या व्यापाऱ्यासाठी आणला होता, याचा प्रशासनाकडून शोध सुरू
Jalgaon Fake Khoya Seized
Jalgaon Fake Khoya SeizedPudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon Fake Khoya Seized

जळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असतानाच भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात आणण्यात आलेला २४० किलो संशयित बनावट खवा प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. या खव्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६५ हजार रुपये असून, या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिवाळीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा फायदा घेऊन गुजरातमधील अहमदाबाद येथून संशयास्पद खव्याचा साठा जळगावच्या बाजारपेठेत आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, शहरातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाबाहेर हा साठा आल्याची माहिती मिळताच प्रशासनाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली.

Jalgaon Fake Khoya Seized
Jalgaon News | ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; शिरसाळा पाझर तलावाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

२४० किलो खवा जप्त; नमुने तपासणीसाठी पाठविणार

या कारवाईदरम्यान पथकाने २४० किलो संशयित खवा ताब्यात घेतला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी खव्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर खवा भेसळयुक्त किंवा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सणासुदीच्या काळात खवा, मिठाई आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी. खवा व मिठाई अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Jalgaon Fake Khoya Seized
Jalgaon News |बदनामीची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ७ वर्षे कारावास!

अहमदाबादहून आणलेला हा खवा जळगावमधील नेमक्या कोणत्या व्यापाऱ्याने किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.