

जळगाव : चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी वैद्यकीय पथकासह घटनास्थळी व वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली.
घटनेची चौकशी करून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून दोन दिवसात संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच संबंधित आदिवासी भागातील कर्जाने उपकेंद्र येथे रुग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चोपडा तालुक्यातील वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या कर्जाने उपकेंद्राच्या हद्दीत नुकतीच एक आदिवासी महिला भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्यासह बालरोग तज्ञ व स्त्री रोग तज्ञ यांच्या पथकासह घटनास्थळी व संबंधित उपकेंद्र कर्जाने येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. सबंधित महिला तिच्या पतीसोबत दुचाकीवरून कर्जाने उपकेंद्रात आली होती. तिथून तिला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर येथे नेले जात असताना वाटेतच प्रसववेदना तीव्र झाल्यामुळे बाळाचा जन्म रस्त्यातच झाला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली असून दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करून जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या सोबतच उपकेंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी आणखी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सदर उपकेंद्राला नवीन रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार आहेत.