

जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस व या वेळेस कॅबिनेट मंत्र्यांची संख्या सारखीच राहिलेली आहे. फक्त यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाऐवजी भाजपाचे दोन कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मात्र जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे जाणार हे महत्त्वाचे आहे. गेल्या वेळेस शिवसेना शिंदे गटाकडे पालकत्व होते. त्यामुळे यावेळेसही त्यांचा दावा असणार आहे. मात्र गिरीश महाजन व संजय सावकारे हेही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागू शकतात. त्यात गिरीश महाजन हे नाशिकला महत्त्व देत असून संजय सावकारे दावेदारी करू शकतात.
जळगाव जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपा यांचे बहुमत समसमान आहे. शिवसेना पाच, भाजपा पाच असे विधानसभेमध्ये आमदार निवडून आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या शिंदे सरकारच्या काळात तीन कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्यात होते. आता देवेंद्र फडवणीस यांच्या कारकिर्दीमध्ये तीन मंत्री आहेत व तीनही कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र यामध्ये फरक इतकाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांच्या जागी भाजपाचे संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
असे असले तरी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेऊनही खातेवाटप झालेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देणार याकडे लक्ष लागून आहे. यामध्ये गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय किंवा ग्रामविकास खाते तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व पर्यटन तर संजय सावकारे यांच्याकडे समाज कल्याण खाते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
तिनही कॅबिनेट मंत्र्यांचे कडे बघितले असता गिरीश महाजन हे नाशिकचे पालकत्व घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत तर गेल्या वेळेस गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी त्यांना मिळू शकते तर सावकारे यांच्याकडे राज्यमंत्री असताना अडीच वर्षांचा पालकमंत्र्यांच्या अनुभव आहे. मात्र जळगाव जिल्ह्यासाठी गुलाबराव पाटील हे मुख्य दावेदार आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे नाशिक किंवा नांदेड या जिल्ह्याचे पालक मंत्री होऊ शकतात तर सावकारे यांना नंदुरबार किंवा बुलढाणा जिल्हा मिळू शकतो. जर या महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी आपापल्या बलानुसार जिल्ह्याची वाटणी केली तर चित्र अजूनही वेगळे असू शकते मात्र जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी गुलाबराव पाटील हे मुख्यतः दावेदार असल्याचे मिळालेल्या सूत्रावरून स्पष्ट होत आहे.