

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना येथे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवांची आठवण प्रशासकीय सेवेत कायम राहील, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथे बदली झालेल्या श्री. अंकित यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची उत्तम परंपरा असल्याने जळगावात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात मंगळवारी (दि.1) मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचा निरोप समारंभ आणि नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. अंकित यांनी भावना व्यक्त करताना जळगावमधील अनुभव कायम स्मरणात राहतील असे सांगितले.
समारंभात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. अंकित म्हणाले की, जळगावमध्ये काम करत असताना अनेक सकारात्मक बदल घडविता आले. हे यश अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे आहे.
नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्री. अंकित यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची शिस्तप्रिय आणि स्थितप्रज्ञ अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी घालून दिलेली परंपरा कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल. समाजसेवा हा माझा मुख्य उद्देश असून, जळगावच्या प्रशासकीय कार्यकाळात सेवा देण्यावर माझा भर राहील. जिल्हा परिषद एक संघ म्हणून कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी श्री. अंकित यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी देखील त्यांचे योगदान नमूद केले. कार्यक्रमात भुसावळ गटविकास अधिकारी सचिन पानझडे, मंजुश्री गायकवाड, श्वेता पालवे, हेमंत भदाणे, प्रतिभा सुर्वे, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांनी 'आने से उनकी आये बहार' हे गीत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले.