

जळगाव : आदिवासी विद्यार्थ्यांमधील बुद्धिमत्तेचा शोध घेण्यासाठी दैनिक पुढारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली टॅलेंट सर्च शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटल म्युझिक स्कूल येथे सोमवार (दि.7) रोजी उत्साहात पार पडली.
दैनिक पुढारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने टॅलेंट सर्च परीक्षेच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी यावल आदिवासी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळांचे निवडक शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. एम. लवणे, कनिष्ठ विस्तार अधिकारी व्ही. डी. गायकवाड, एम. डी. पाईकराव, दीपक विनंते तसेच तज्ज्ञ प्रशिक्षक योगेश महाजन आणि रमेश जाधव. कार्यशाळेची प्रस्तावना आणि कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दैनिक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक राजेश पाटील यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद पाईकराव यांनी आपल्या मनोगत सांगितले की, आदिवासी मुलांमध्ये स्पर्धा परीक्षासंदर्भातील वातावरण पुढारीने निर्माण करण्यात मदत केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याची मदत होत आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम. डी. लवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धेच्या युगामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा खूप मोठा फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना परीक्षेचा अभ्यास त्याचा सराव कसा करावा, परीक्षा कालावधीत वेळेचे नियोजन कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर होणार आहे.
दुसऱ्या सत्रामध्ये योगेश महाजन यांनी गणित व बुद्धिमत्ता या विषयांवर विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना सोप्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने शिकवाव्यात यावर मार्गदर्शन केले. आदिवासी विद्यार्थी व शिष्यवृत्ती याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. रमेश जाधव यांनी मराठी आणि इंग्रजी व्याकरण यामध्ये विद्यार्थ्यांची तयारी कशी करावी, सराव कसा करावा यावर शिक्षकांशी संवाद साधला. दैनिक पुढारीचे प्रकल्प समन्वयक राजेंद्र महाजन यांनी परीक्षेसंबंधीची माहिती दिली व आभार मानले.