

जळगाव : राष्ट्रवादी पक्षाने विधानसभेला 59 जागांपैकी 41 जागांवर विजय मिळवला. नाशिक, जळगाव व छत्रपती संभाजी नगरमध्ये शंभर टक्के यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा उत्तर महाराष्ट्र एक पाऊल पुढे उभा राहिला आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपण घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढवणार असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना सुनील तटकरे म्हणाले की, येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका घड्याळ चिन्हावर आपण लढणार आहोत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागे दादा आणि मी भक्कमपणे उभा राहणार व त्यांच्यासाठी ताकद देणार. राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व नियुक्त्या येत्या 15 ते 20 दिवसात झाल्या पाहिजे असे आदेशही दिले.
कार्यकर्त्यांचे संघटनात्मक कौशल्य, त्याची काम करण्याची इच्छा या अनेक गोष्टींमधून कार्यकर्ता घडून मोठ्या पदावर जाऊ शकतो. तळागाळातील योग्य कार्यकर्त्यांना संधी द्या म्हणजे ते उद्या आपल्या पक्षाची ताकद बनतील. जो पुढचे चार महिने झोपणार नाही व पक्षासाठी वाहून देईल, अशांना पदाची जबाबदारी दिली जाईल, असे ते म्हणाले.