

जळगाव : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत "संडे ऑन सायकल" हा विशेष उपक्रम रविवार (दि.2) रोजी संपूर्ण देशभरात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, खेलो इंडिया सेंटर, सायकलिंग क्लब, क्रीडा मंडळे आणि स्थानिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून रॅलीला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी विशाल बोडके आणि भरत देशमुख यांच्या हस्ते रविवार (दि.2) रोजी सकाळी 7.00 वाजता झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरमधील खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेतला. "फिटनेस का डोस, आधा घंटा रोज" या घोषणांद्वारे सायकलपटूंनी नागरिकांमध्ये फिटनेसविषयी जागरूकतेचा संदेश दिला. ही सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातून सुरू होऊन शहरातील मार्केट परिसर, सिव्हिल हॉस्पिटल, मेहेरूण तलाव परिसर मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, बॉक्सिंग क्रीडा मार्गदर्शक नीलेश बाविस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.