

जळगाव: राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करताच जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. विशेषतः लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने, जिल्ह्यातील सहा प्रमुख नगरपालिकांमध्ये आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदा अनेक ठिकाणी आमदारांच्या पत्नी उमेदवारीच्या चर्चेत असल्याने ‘महिला राज’ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
सहा ठिकाणी आमदारांचे थेट आव्हान
चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, पारोळा आणि मुक्ताईनगर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी स्थानिक आमदारांचे वर्चस्व आणि त्यांची नेतृत्वक्षमता तपासली जाणार आहे. विशेषतः पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे तिरंगी किंवा चौरंगी लढतींची शक्यता असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
‘धर्मपत्नी’ ठरवणार नगराध्यक्षपदाचा चेहरा!
भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांमध्ये घरातील सर्व पदे एकाच कुटुंबात नसावीत असा दावा केला जातो. मात्र जळगावात या अपवादाची नोंद घेतली जात आहे. अनेक ठिकाणी आमदारांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी तयारीत आहेत. असे की,....
पाचोरा: आमदार किशोर आप्पा यांची पत्नी
जामनेर: आमदार गिरीश महाजन यांची पत्नी
भुसावळ: आमदार संजय सावकार यांची पत्नी
चाळीसगाव: आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
मुक्ताईनगर: आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या मैदानात उतरू शकतात
युती न झाल्यास कडवी लढत निश्चित
राज्यात सध्या महायुती सत्तेत असली तरी, स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युतीचे गणित जुळले नाही तर तिरंगी आणि चौरंगी लढती अटळ आहेत. भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येच थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात ‘महिला राज’चा बोलबाला
अनेक नगराध्यक्षपदे महिलांसाठी आरक्षित झाल्याने या निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय वाढणार आहे. धरणगाव, पाचोरा, यावल, रावेर, फैजपूर, जामनेर, भडगाव, सावदा, भुसावळ आणि चोपडा येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे राजकारणात नव्या महिला चेहऱ्यांचे आगमन होणार आहे. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, उमेदवारी अर्ज दाखल होऊ लागल्यावर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.