

जळगाव : असोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे नगरातील एका ३० वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.16) रोजी मध्यरात्री उघडकीस आली. मृत्यूपूर्वी त्याचा काही तरुणांशी वाद झाल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे घातपाताबाबत चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हर्षल प्रदीप भावसार हा मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील असा परिवार आहे.
रेल्वे स्टेशन अधिकारी राजेश पालरेचा यांच्या म्हणण्यानुसार, रविवार (दि.16) रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजता मालगाडीच्या लोको पायलटने खांबा क्रमांक 433/14 अ ते 433/16 अ दरम्यान एका व्यक्तीचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या घटनेची नोंद रात्री दोनच्या सुमारास करण्यात आली.
तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे आणि हवालदार प्रकाश चिंचोरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. हर्षलचा मृत्यूपूर्वी काही तरुणांशी वाद झाल्याचे सांगितले जात असून, त्यावरून घातपाताची शक्यता चर्चेत आहे.