

जळगाव: केवळ भुसावळमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात कमळ फुलणार आहे. आगामी काळात मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहील, असा ठाम विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शनिवार (दि.20) रोजी आज व्यक्त केला.
भुसावळ येथील प्रभाग ११ ‘ब’ च्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या मातोश्री, पत्नी तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी सावकारे उपस्थित होत्या.
भुसावळसह राज्यात कमळ फुलणार
प्रभाग ११ ‘ब’ ची निवडणूक काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. शनिवार (दि.20) रोजी आज या प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोलताना सावकारे म्हणाले, उद्या मतमोजणी असली तरी निकालाबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे. भुसावळ शहरासह संपूर्ण राज्यात भाजपची लाट आहे आणि कमळ नक्कीच फुलेल.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘जळगाव प्रभारी’ आणि ‘जळगाव निवडणूक प्रमुख’ या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर सावकारे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या असतात. मी स्वतः नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी जिल्हा प्रभारी होतो. नगरपंचायत निवडणुकीदरम्यान जळगावसाठी मंगेश चव्हाण आणि रावेरसाठी हिंदू महाजन हे निवडणूक प्रमुख होते. त्यामुळे कोणताही वाद असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षहित लक्षात घेऊनच जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाते.
राष्ट्रवादीशी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर
राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीबाबत विचारले असता सावकारे यांनी सांगितले की, युतीबाबतचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी युती केल्याने पक्ष आणि कार्यकर्त्यांचा फायदा होईल, तिथे युती केली जाईल. स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देणे ही आमची प्राथमिक भूमिका आहे. परिस्थितीनुसारच युतीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.