

जळगाव : जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचे जाळे किती खोल गेले आहे, याचा धक्का बसवणारा खुलासा मोहाडी परिसरात झालेल्या मोठ्या कारवाईत उघड झाला आहे. या कारवाईत सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने तब्बल 3000 ब्रास वाळू जप्त केली आहे. गिरणा नदीपात्रातच वाळू माफियांनी उभारलेली तांत्रिक व्यवस्था, मजुरांची सोय आणि डंपर वाहतुकीसाठी तयार केलेले खास रस्ते पाहून अधिकाऱ्यांनाही याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नदीतच उभारला अवैध वाळू माफियांचा तळ
मोहाडी गावाजवळ वाळू माफियांनी पाईपलाईन, तराफे आणि डंपरमार्ग तयार करून उपसा सतत सुरू ठेवला होता. मजुरांसाठी स्वयंपाकाची पूर्ण सोय, गॅसची हंडी, मसाले आणि अन्नधान्य साठवले होते. इतकी मोठी तयारी स्थानिक प्रशासनाच्या नकळतपणे होऊच शकत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
महसूल आणि पोलिसांचे मौन संशयास्पद
अवघ्या काही अंतरावर गाव असूनही महसूल विभाग आणि स्थानिक पोलिसांना हा उद्योग कसा दिसला नाही, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठी आणि ग्रामसेवकांनी त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष का केले? नदीपात्रात तयार केलेले रस्ते आणि सतत होणारी डंपर वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली? या निष्क्रियतेमागे काहीतरी आर्थिक स्वार्थ दडला असल्याची शंका स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांची निर्णायक कारवाई
नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी देखील वाळू माफियांच्या कारवाया केवळ औपचारिक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यावरुन महसूल विभागातील गौण खनिज शाखेने इतक्या दिवसांत कोणती कारवाई केली, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
या अवैध धंद्याच्या मूळ सूत्रधारांचा माग घेऊन तपास करावा. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि पोलिसांची सखोल चौकशी करून त्यांच्या मागील काही महिन्यांच्या कामकाजाचा ताळेबंद तपासावा. वाळू उपशासाठी वापरलेली पाईपलाईन, तराफे आणि इतर साहित्य नष्ट करून दोषींवर कठोर गुन्हेगारी कारवाई करावी, अशी मागणी अवैध वाळू उपशाच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली आहे
याबाबत अधिक माहिती देतांना दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, यापूर्वी प्रशासन गंभीर नव्हते. मात्र नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पथक पाठवून मोठी कारवाई केली आणि 3000 ब्रास वाळू जप्त केली आहे. ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षतेकडे लक्ष वेधून घेणारी असून दोषींवर ठोस कारवाईची अपेक्षा करत आहेत.