

Raksha Khadse on Pranjal Khewalkar
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तितकीच भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. "जिल्ह्यातील राजकारणामुळे मलाही वेदना होत असून, नेत्यांनी आता हे सर्व थांबवून केवळ विकासावर लक्ष केंद्रित करावे," असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.
प्रांजल खेवलकर प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळत, त्यांनी जिल्ह्याच्या व्यापक हिताचा मुद्दा मांडून आपली परिपक्व भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच प्रांजल खेवलकर प्रकरणामुळे वातावरण अधिकच गढूळ झाले आहे. याच संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, रक्षा खडसे यांनी कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे टाळले आणि आपली भूमिका विकासाच्या मुद्द्यावरच केंद्रित ठेवली.
त्या म्हणाल्या की, "जिल्ह्यात जे राजकारण सुरू आहे, त्याच्या वेदना मलादेखील होत आहेत. हे सर्व आता थांबायला पाहिजे. जिल्ह्यातील कोणताही नेता असो, त्याने विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. इतर सर्व गोष्टी सोडून फक्त विकासावर बोलल्यास जिल्ह्याचा निश्चितच फायदा होईल."