

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी फरार असलेल्या चार संशयितांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक करत भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने त्यांना 5 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, यातील एकाला यापूर्वीच जामीन मंजूर झालेला असून, अद्याप तीन संशयित फरार आहेत. त्यांच्या मागावर पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त कोथळी येथील मुक्ताबाई यात्रेदरम्यान मंत्री खडसे यांची अल्पवयीन मुलगी मैत्रिणींसमवेत यात्रेत फिरण्यास गेली असता टवाळखोरांनी तिची छेड काढली होती. त्यातील प्रमुख संशयित अनिकेत भोई याच्यासह संशयितावर छेड काढणे तसेच मुलीच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील भोईला अटक केल्यानंतर जामीन मंजूर झाला होता, तर इतर संशयित फरार होते.
घटना होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही संशयितांना अटक केली जात नसल्याने तसेच ताब्यात घेतलेल्या एकाला जामीन मंजूर झाल्याने मंत्री खडसे यांनी थेट पोलिस ठाणे गाठत पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तसेच सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया आल्याने पोलिसांनी उर्वरित संशयितांचे अटकसत्र सुरू केले आहे.