

जळगाव : जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया (वय 55) यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. कावडिया यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असली, तरी कुटुंबीयांनी मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कावडिया यांनी रविवार (दि.9) पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, त्यांनी स्वतः विष घेतल्याचे रुग्णालयात दाखल होताना सांगितले होते. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अलीकडेच संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी महाविद्यालयांची परवानगी रद्द करण्यात आली होती, तसेच महाविद्यालयाच्या इमारती पाडण्याचे आदेशही जारी झाले होते. त्यामुळे कावडिया गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे बोलले जात आहे.
कावडिया यांच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. त्यांचे जावई तन्मय भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी विषप्राशन केलेले नाही. ते काही दिवसांपासून तणावात होते आणि आर्थिक अडचणीतही होते, असे सांगितले. शवविच्छेदनानंतर अहवाल राखीव ठेवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. राजकुमार कावडिया यांच्या पार्थिवावर आज सोमवार (दि.10) सायंकाळी पाच वाजता जामनेर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.