Woman delivery in Train: रेल्वे कर्मचाऱ्याची तत्परता! चालत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये महिलेची सुरक्षित प्रसूती

मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
Woman delivery in Train: रेल्वे कर्मचाऱ्याची तत्परता! चालत्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये महिलेची सुरक्षित प्रसूती
Published on
Updated on

जळगाव/भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एका मुख्य तिकीट निरीक्षकाने (CTI) दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे एका गर्भवती महिलेची रेल्वेमध्येच सुरक्षित प्रसूती झाली आहे. मुख्य तिकीट निरीक्षक आर. एस. तेली यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१० मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या 'कुशीनगर एक्सप्रेस' (गाडी क्र. २२५३८) मध्ये आर. एस. तेली कर्तव्यावर होते. गाडी कल्याण स्थानक सोडून पुढे गेल्यानंतर, ए-१ (A/1) कोचजवळील जनरल डब्यातून एका प्रवाशाने माहिती दिली की, एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याने आणि महिलेची प्रकृती पाहता परिस्थिती गंभीर बनली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून श्री. तेली यांनी तातडीने हालचाल केली. गाडी कसारा स्थानकावर पोहोचताच, काही प्रवाशांच्या मदतीने त्यांनी संबंधित महिलेला गर्दीच्या डब्यातून बाहेर काढून सुरक्षितपणे ए-१ कोचच्या मोकळ्या परिसरात (कॅरी डोअर जवळ) आणले.

योगायोगाने, त्याच जनरल डब्यात श्रीमती पूजा खरगे (नर्स/डॉक्टर) प्रवास करत होत्या. श्री. तेली यांनी त्यांची मदत घेतली आणि रेल्वेमध्येच या महिलेची नैसर्गिक प्रसूती पार पडली. महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला.

प्रसूती दरम्यानच श्री. तेली यांनी मुख्य वाणिज्य नियंत्रक (मुंबई) यांना कळवून पुढील व्यवस्थेची मागणी केली. परिणामी, गाडी इगतपुरी स्थानकावर पोहोचताच तिथे डॉक्टर आणि रेल्वे कर्मचारी स्ट्रेचरसह सज्ज होते. रुग्णवाहिकेची व्यवस्था आधीच करण्यात आली होती.

इगतपुरी येथे प्राथमिक तपासणी केल्यानंतर माता आणि नवजात बालिकेला पुढील उपचारांसाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे.

"भारतीय रेल्वेच्या 'प्रवासी सेवा आणि सुरक्षा' या ब्रीदवाक्याचे उत्तम उदाहरण श्री. आर. एस. तेली यांनी आपल्या कृतीतून सादर केले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news