जळगाव : भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आपल्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातच राहण्याचा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा निर्णय पक्षातीलच माजी मंत्र्याला रुचलेला नाही. पक्षातील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी खडसे यांना निष्ठा सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यामुळे खडसे यांचा मूळ पक्षातील प्रवासही सुखदायी राहणार नसल्याचे अधोरेखित झाले आहे.
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी हिरवा कंदील दाखवूनही राज्यातील नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे खडसे यांना पुन्हा कमळावर स्वार होता आलेले नाही. याच कारणाने आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटात राहून सक्रिय होऊन काम करणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले. तथापि, त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्षेप नोंदविला आहे.
ज्यांना पक्षात यायचे त्यांना येऊ द्या; मात्र त्यांनी आपली निष्ठा सिद्ध करावी, असे खडसे यांचे नाव न घेता सतीश पाटील यांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. खडसे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत, हे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सांगायला हवे. अशा नेत्यांमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे डॉ. सतीश पाटील यांनी म्हटले आहे. डॉ. पाटील यांनी पक्षातूनच खडसे यांच्या निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने खडसे यांच्यापुढे पक्षातच आव्हान राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.