चोपड्यात अवैध बियाण्यांचा ५ लाखांचे एचटीबीटी बियाणे जप्त

Jalgaon News | चुंचाळे शिवारात कृषी विभागाची मध्यरात्री मोठी कारवाई; बियाणे माफिया नितीन चौधरीवर गुन्हा दाखल
MahaBeej QR code
Kharif seeds supply Farmer(Pudhari Photo)
Published on
Updated on

जळगाव : खरिपाचा हंगाम तोंडावर असतानाच जळगाव जिल्ह्यात बियाणे माफियांनी आपले डोके वर काढले आहे. चोपडा तालुक्यातील चुंचाळे शिवारात शासनाने प्रतिबंधित केलेले आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले 'सुपरकिंग' वाणाचे तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे 'एचटीबीटी' कापूस बियाणे कृषी विभागाने धाड टाकून जप्त केले आहे. याप्रकरणी बियाणे माफिया नितीन नंदलाल चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,२० एप्रिल २०२६ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चुंचाळे शिवारातील आरोपी नितीन चौधरी याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. बियाणे निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी रामचंद्र मिठाराम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाने सापळा रचला होता. यावेळी ९ गोण्यांमध्ये भरलेले ४५० ग्रॅम वजनाचे एकूण ४५० पाकिटे आढळून आली. या पाकिटांवर कोणत्याही उत्पादकाचे नाव, बॅच नंबर किंवा अधिकृत पत्ता नव्हता.

जप्त करण्यात आलेल्या 'सुपरकिंग' वाणाच्या प्रत्येक पाकिटाची किंमत १२०० रुपये लावून आरोपी शेतकऱ्यांना विनाबिलाने हे बियाणे विकण्याच्या तयारीत होता. शासनाने अशा प्रकारच्या वाणांवर बंदी घातली असतानाही, केवळ अधिक नफा कमावण्यासाठी बियाणे माफिया शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन नंदलाल चौधरी याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(A) सह बियाणे नियंत्रण आदेश १९८३ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसली तरी, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि एकनाथ भिसे हे करत आहेत. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news