

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हॉटेलच्या आडोशाला सुरू असलेल्या मृत्यूच्या छुप्या कारभाराचा जळगाव पोलिसांनी अड्डा उध्वस्त केला आहे. पारोळा शिवारात बेकायदेशीररित्या साठवलेल्या 'सोडियम बाय सल्फेट' या घातक रसायनावर छापा टाकत पोलिसांनी ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने केमिकल माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवारी, ११ मे रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील म्हसवे शिवारात 'रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेल'च्या मागील बाजूस दिनेश पोपटराव पाटील (वय ४३) हा इसम मानवी जीविताला धोका होईल अशा पद्धतीने घातक रसायनाचा साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करत आहे. माहिती मिळताच अधीक्षकांनी पारोळा पोलिसांचे विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, तिथे रसायनांचा मोठा साठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घातक रसायन सुमारे ३८,७५० लिटर उग्र वासाचे रसायन अंदाजे किंमत ४.४३ लाख रुपयांचे, वाहन क्रमांक एम एच 04 एफ जे 5229 यास एक मोटरसायकल व जमिनीखालील टाक्या, रिकामे टँकर, १ एचपी मोटर आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 9 लाख 32 हजार 125 रुपयांचा जप्त मुद्देमाल सहआरोपी दिनेश पाटील (रा. खांडेकर वाडा, पारोळा) याला अटक करण्यात आलेली आहे. याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७१, २७२, २८६, २८७, २८८, ३१६(३), ३१७(२) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि योगेश महाजन हे करत आहेत.