Pachora Gram Sabha: ग्रामसभेत प्रश्न विचारणे पडले महागात; माजी सरपंचाकडून तरुणाला मारहाण

पाचोऱ्यातील जार गावातील घटना; पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Dispute
DisputePudhari
Published on: 
Updated on: 

पाचोरा: तालुक्यातील जार गाव येथे नाथ मंदिर परिसरात आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला माजी सरपंचाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा (NC) नोंदवण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना गावातील एका सुजाण तरुणाने प्रशासकीय कामांविषयी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी माजी सरपंच तथा बाजार समिती संचालक सुनील पाटील यांनी चर्चेत हस्तक्षेप करत बोलण्यास सुरुवात केली. तरुणाने तत्काळ, "मी तुम्हाला नाही, तर थेट प्रशासकाला जाब विचारत आहे," असे स्पष्ट शब्दात सांगितले. यावरून संतापलेल्या सुनील पाटील यांनी वादात शब्दांऐवजी बळाचा वापर करत त्या तरुणाला थेट मारहाण केली.

पोलीस ठाण्यात तक्रार

भरसभेत झालेल्या मारहाणीनंतर संबंधित तरुणाने पाचोरा पोलीस ठाणे गाठून सुनील पाटील यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

माजी सरपंचांचा वेगळाच दावा

या प्रकरणावर बोलताना माजी सरपंच सुनील पाटील यांनी वैयक्तिक वादाचा संदर्भ दिला. "संबंधित तरुणाच्या घरातील सांडपाणी सातत्याने माझ्या प्लॉटमध्ये सोडले जाते, ज्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे," असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, ग्रामसभेत नागरिकांच्या हक्काच्या व्यासपीठावर प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा तालुक्यात संताप आणि जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news