

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीचा आशिया खंडातील सर्वात उंच प्रशासकीय इमारत म्हणून गौरव केला जातो. मात्र दुसरीकडे, याच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याचे वास्तव समोर येत आहे. पोलीस लाईन परिसरातील मनपा शाळा क्रमांक ५ मध्ये सध्या केवळ १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर शिक्षकांची संख्या ३ आहे. म्हणजेच प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी स्थिती आहे.
शैक्षणिक वर्ष 2024–25 मध्ये शाळेत १२ विद्यार्थी असूनही येथे शासनाच्या नियमानुसार तीन शिक्षक कार्यरत आहेत. यावरून मनपा शाळांची वास्तविक स्थिती स्पष्ट होते. मागील चार वर्षांचा आकडा पाहता या शाळेची पटसंख्या सातत्याने घसरत आहे.
2021–22 : 35 विद्यार्थी
2022–23 : 30 विद्यार्थी
2023–24 : 22 विद्यार्थी
2024–25 : 12 विद्यार्थी
शहरात खासगी शिक्षण संस्थांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही मनपा शाळांचे प्रशासन विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. शिक्षकांचे लक्ष विद्यार्थ्यांऐवजी स्वतःच्या सेवेकडे अधिक आहे, अशीही टीका होत आहे. पालकही सरकारी शाळांऐवजी खासगी पर्याय निवडत असल्याचे चित्र दिसते.
“शासनाच्या नियमानुसार महानगरपालिका शाळेसाठी तीन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. पहिली ते पाचवीसाठी दोन शिक्षक व सहावी–सातवीसाठी एक शिक्षक असा पदसंख्येचा नियम आहे. ही शाळा शंभर वर्ष जुनी असून तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
जाकीर शेख, प्रभारी शिक्षण अधिकारी, महानगरपालिका जळगाव
जळगाव महापालिकेच्या इमारतीची जशी ख्याती आहे, तशीच त्याअंतर्गत येणाऱ्या शाळांनाही नाव मिळावे, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मनपा शाळा केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. शाळांमधील रिकामे बाकडे भरलेली शिक्षक पदे यावरून या व्यवस्थेचे दुर्दैवी चित्र समोर येत आहे.