

जळगाव : पारोळा तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत अपघाताचा बनाव करून विम्याची रक्कम लाटण्यासाठी युवकाचा खून केल्याची बाब उघडकीस आली आहे.
मृत समाधान शिवाजी पाटील याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून करण्यात आला. सुरुवातीला या घटनेला अपघात समजण्यात आले होते, मात्र पोलीस तपासात अपघात नसून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शनिवार (दि.19) रोजी खून झाल्याची घडली. पारोळा पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढील तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता परिस्थिती संशयास्पद वाटली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केल्यावर, अपघात नव्हे तर नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपी संदीप भालचंद्र पाटील (रा. शेवगे बु., ता. पारोळा) याने आपल्या मेहुण्याच्या (शालक) नावावर विमा पॉलिसी काढली होती. त्या पॉलिसीचा लाभार्थी म्हणून आरोपीची पत्नी आणि मृतकाची आई नमूद होती. शिवाय खोटा अपघात दाखवलेली स्कुटीही विमाधारकाची होती.
संदीप पाटील आणि त्याचा साथीदार चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी मिळून हा कट रचला. त्यांनी समाधान पाटीलला स्कुटीवर बसवून धुळे-जळगाव रोडच्या अंधाऱ्या भागात नेले आणि लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्याचा खून केला. नंतर हे अपघातासारखे भासवले.
पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०३, ६१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.