

जळगाव : जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी मध्यरात्री आवडल्या आहे. जळगावहून पहूरकडे गांजा घेऊन जाणाऱ्या एका ‘इनोव्हा’ कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी ६३ किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत एकूण २२ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबई आणि धुळ्यातील सहा तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना जळगावहून पहूरकडे अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पहूर पोलिसांच्या मदतीने सापळा लावला. वाकोद गावाच्या पुढे संशयास्पद 'इनोव्हा' कार क्रमांक एम एच -04- डी जे-2042 दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग केला. पोलिसांनी गाडी रोखली असता, त्यात तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम गांजा लपवलेला आढळला.
खरेदी अकोल्यातून, मार्केट मुंबई-धुळ्यात?
कारमधील सागर इंगवले, इरफान शेख आणि अमन खान या तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा गांजा अकोला जिल्ह्यातील खामगाव येथून खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच धुळ्यातील नईम शेख याकुब, आबीद खान आणि तोहसिफ खान यांच्या सांगण्यावरून ते ही वाहतूक करत होते. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून ‘मारुती रिट्झ’ क्रमांक एम एच -18- डब्ल्यूबी-2526 कार सह या तिन्ही मुख्य सूत्रधारांना देखील ताब्यात घेतले.
हे आहेत अटकेतील आरोपी:
१) सागर संजय इंगवले (रा. विचुंबे गाव, नवी मुंबई)
२) इरफान अक्रम शेख (रा. गोरेगाव, मुंबई)
३) अमन ताज खान (रा. वर्सोवा, मुंबई)
४) नईम शेख याकुब (रा. माणिकनगर, धुळे)
५) आबीद खान मेहमूद खान (रा. जाममोहल्ला, धुळे)
६) तोहसिफ खान रसूल खान (रा. १०० फुटी रोड, धुळे)
जप्त मुद्देमाल (एकूण किंमत: २२,७४,२०० रुपये)
गांजा: ६३ किलो ७१० ग्रॅम (किंमत १२,७४,२०० रुपये)
इनोव्हा कार: (किंमत ७,००,००० रुपये)
मारुती रिट्झ कार: (किंमत ३,००,००० रुपये)
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पीआय राहुल गायकवाड, पहूरचे सपोनि प्रमोद कठोरे, पीएसआय शरद बागल, सहा फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, .किशोर पाटील आणि .रवींद्र कापडणे, राहुल रगडे, अजय पाटील, प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे सर्व नेम-स्थागुशा जळगांव तसेच पहूर पोस्टेचे ज्ञानेश्वर डाकरे, दिपक पाटील, राहूल पाटील, संदिप धनगर, विनोद पाटील, राहूल जोहरे या पथकाने पार पाडली. पहूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय गणेश सुस्ते करत आहेत.