

जळगाव : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद आज जळगाव नगरीत उमटले. पुणे येथील मॉडर्न कॉलेजच्या महिला प्राध्यापिकेला झालेल्या अटकेनंतर या रॅकेटची पाळेमुळे शोधण्याची मागणी करत, आज बुधवार २० मे २०२ रोजी सकाळी महाविकास आघाडीच्या युवक संघटनांनी जळगाव येथील एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.
'१० रुपयांचे लहान मुलांचे डायपर देखील लीक होत नाही, मग हजारो रुपये फी घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे पेपर कसे लीक होतात?' असा तिखट सवाल करत आंदोलकांनी सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणली. आंदोलनादरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची टांगाटोळी करत त्यांना ताब्यात घेतले व रामानंद नगर पोलीस ठाण्यात नेले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराची थट्टा उडवणारे व्यंगात्मक आंदोलन केले. यावेळी चक्क फुटलेल्या नीट प्रश्नपत्रिकेची जाहीर बोली लावण्यात आली. "१६ लाख... २० लाख... २२ लाख..." अशा किमतीत उपस्थितांनी प्रश्नपत्रिका खरेदी करण्याची प्रतिकृती सादर करत 'शिक्षण बाजाराचे' विदारक चित्र मांडले. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय असून, शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता संपूर्णपणे धोक्यात आल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.
"शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे...", "केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा" आणि "केंद्र शासनाचे करायचे काय? खाली डोकं वर पाय..." अशा गगनभेदी घोषणांनी एम. जे. कॉलेजचा परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आंदोलकांना उचलले व पोलीस गाड्यांमध्ये कोंडले. आंदोलन महाविकास आघाडीच्या युवक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी विराज कावडीया, रिंकू चौधरी, मुजीब पटेल, विनायक पाटील, प्रितम शिंदे आणि गौरव वाणी यांच्या संयुक्त नेतृत्वात यशस्वीपणे पार पडले.
या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावमधील मविआचे अनेक ज्येष्ठ व प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते. यामध्ये गुलाबराव वाघ, शरद तायडे, अशोक लाडवंजारी, शाम तायडे, निलेश चौधरी, सुनिल माळी, भाऊसाहेब सोनवणे, संग्राम सुर्यवंशी, शोएब खाटीक, जाकिर बागवान, आकिब शेख, बाबा देशमुख, आकाश हिवाळे, ॲड. अविनाश महिरे, चेतन पवार, पारस तायडे, रोहीत जंगले, अजय खैरनार, मुजक्कीर शेख, अजय वंजारी, विशाल पवार, गौरव डांगे, कुणाल हटकर, घनशाम लोहार, मच्छिंद्र निकम आदींसह शेकडो कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.