Narendra Modi | 'लखपती दिदी' मुळे महिलांचा सन्मान वाढून संपूर्ण परिवाराचा भाग्योदय

'लखपती दिदी' म्हणजे आर्थिक सक्षम बनविणेच नाही तर महिलांचा सन्मान वाढवणे
Narendra Modi | 'लखपती दिदी' मुळे महिलांचा सन्मान वाढून संपूर्ण परिवाराचा भाग्योदय
Published on
Updated on

जळगाव : जळगाव विमानतळाच्या समोरील प्राईम इंडस्ट्रियल या ठिकाणी 'लखपती दिदी'चं महासंमेलन पार पडले. यावेळी पंतप्रधान यांनी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहीणींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत याद्वारे मिळाली आहे. या पैशांतून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळणार असून सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी संमलेनात निरोप घेतांना म्हटले.

तीन करोड महिलांना लखपती दिदी बनवायचे असून महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी नवनवीन योजना तयार केल्या जात आहेत. त्यांना आर्थिक सक्षम बनवणे एवढेच ध्येय नसून या योजनांमुळे त्यांच्या परिवारामध्ये त्या महिलेचा सन्मान वाढतो आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराचा विकास होऊन त्यांचे भाग्य बदलत आहे, असे माेदींनी सांगितले.

केंद्र सरकारची 'लखपती दिदी' योजना अशी आहे

केंद्र सरकारची 'लखपती दिदी' या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. वयवर्ष १८ ते ५० वर्ष वयोगटातील महिला सरकारच्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी १ ते ५ लाख रूपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलेने राज्यातील मूळ रहिवासी असणं आणि बचत गटात सहभागी होणं बंधनकारक असणार आहे. जळगावील कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत २ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधीचं वाटप केलं जाणार आहे. बचत गटातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन लखपती दीदी करण्याचा प्रयत्न असणार असून योजनेद्वारे २ कोटीवरून ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे.

लखपती दिदी, जळगाव
जळगाव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'लखपती दिदी' संमेलनासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले असता त्यांच्या स्वागतासाठी , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित झाले (छाया : नरेंद्र पाटील)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर शानदार स्वागत

जळगाव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'लखपती दिदी' संमेलनासाठी जळगाव विमानतळावर आगमन झाले असता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दिदी संमेलन स्थळी आगमन झाले.

लखपती दिदी, जळगाव
प्रधानमंत्री यांच्या आगमनापूर्वी जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.(छाया : नरेंद्र पाटील)

प्रधानमंत्री यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news