

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ जळगाव येथील तरुणाचा खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. जळगाव येथील नितीन साहेबराव पाटील (वय 24) या तरुणाचा व्याजाच्या पैशाच्या वादातून खून झाला असून यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भेट दिली आहे.
घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अद्याप पावतो मयताचे प्रेत आढळून आले नसल्याने पूर्णा नदीच्या पात्रात प्रेताचा शोध घेतला जात आहे.
जळगावातील तरूणाला मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड जवळच्या जंगलात मारून पुर्णा नदीपात्रात फेकून देण्याची भयंकर घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली आहे व पुढील तपासाची चक्रे फिरवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
या संदर्भात मुक्ताईनगर स्थानकाचे निरिक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. यानुसार, जळगाव येथील नितीन साहेबराव पाटील (वय २४ वर्षे ) या तरूणाला काही जणांनी काल पैशांच्या वादातून मुक्ताईनगर येथे नेले होते. मात्र त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्या सोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले.
चौकशी सुरु
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहमाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे. तर, आज सकाळपासून पुर्णा नदीच्या पात्रात संबंधीत तरूणाचा मृतदेह शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी दिली