Jalgaon MD Drugs Seizure: जळगावात ६ लाख ५३ हजारांच्या मुद्देमालासह 'एम.डी.' ड्रग्ज जप्त

तिघा तस्करांना रंगेहाथ अटक
Jalgaon MD Drugs Seizure
Jalgaon MD Drugs SeizurePudhari
Published on
Updated on

जळगाव: शहरातील अजिंठा चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एका कारवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 'एम.डी.' या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, कार, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही जण शहरात एम.डी. ड्रग्जची तस्करी करत आहेत. या माहितीच्या आधारे ४ तारखेला मध्यरात्री १:०० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पोलिसांनी सापळा रचला. तेथे संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कारची झडती घेतली असता, कारमधील तीन इसमांकडे अंमली पदार्थ मिळून आला. फॉरेन्सिक युनिटने घटनास्थळीच या पावडरची प्राथमिक तपासणी करून ते 'एम.डी.' ड्रग्ज असल्याचे स्पष्ट केले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रईस हारुन देशमुख (वय २७, रा. एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव), तौसिफ सैय्यद आरिफ (वय २१, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) व कृणाल ऊर्फ लकी रमेश पाटील (वय ३०, रा. देविदास कॉलनी, जळगाव) या संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी हा अंमली पदार्थ इतर साथीदारांकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलीस आता त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेत आहेत.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

एम.डी. अंमली पदार्थ: ४८ हजार रुपये किमतीचा (१६.११ ग्रॅम)

कार: ४ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी एस-क्रॉस

मोटारसायकल १: ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस

मोटारसायकल २: ७५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर

मोबाईल: ८० हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन

एकूण जप्त मुद्देमाल: ६ लाख ५३ हजार रुपये

या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल मुरलीधर चुडामण धनगर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

नागरिकांना पोलीस अधीक्षकांचे आवाहन

"जळगाव पोलीस दल अंमली पदार्थांच्या तस्करीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांना आपल्या परिसरात अशी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा," असे आवाहन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, आणि प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, जितेंद्र वल्टे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, जयंत चौधरी, तसेच पोलीस अंमलदार सुनील दामोदरे, अकरम शेख, मुरली धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, बबन पाटील, यशवंत टहाकळे, सलिम तडवी, रफिक शेख, राहुल रगडे, मयुर निकम, रवींद्र चौधरी, ईश्वर पाटील, राहुल कोळी, गोपाळ पाटील, विलास गायकवाड, प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, प्रदिप चौरे आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news