

जळगाव: शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असतानाच, जळगाव महानगरपालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापौर दीपमाला काळे या अधिकृत कामासाठी मुंबईला गेलेल्या असताना, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती मनोज काळे यांनी चक्क महापौरांच्या खुर्चीची ‘ताकद’ वापरत पालिका प्रशासनावर आपला हुकूम चालवल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांचा मोर्चा पालिकेवर धडकताच काळेंनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना थेट निर्देश दिल्याने, "पालिकेत नेमकी सत्ता कोणाची?" असा सवाल आता उपस्थित होत आहे.
नेमका प्रकार काय?
शहरातील चौगुले प्लॉट, गल्ली नंबर २ मधील महिलांनी पाण्यासाठी संतप्त होऊन महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीवर मोर्चा काढला होता. यावेळी महापौर शहरात नसल्याने हा गोंधळ थांबवण्यासाठी मनोज काळे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केवळ मध्यस्थी न करता, चक्क पाणीपुरवठा अधिकारी शामकांत भांडारकर यांना घटनास्थळी पाचारण केले. "जुन्या पाईपलाईनचे पाणी सुरू ठेवा किंवा अमृतची लाईन जोडून द्या," अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले.
शासकीय नियमांचे उल्लंघन?
राज्य शासनाने स्पष्ट शासन निर्णय (GR) काढला आहे की, जर पत्नी सरपंच, महापौर किंवा नगरसेवक असेल, तर त्यांच्या कामकाजात पती किंवा नातेवाईकांनी ढवळाढवळ करू नये. असे असतानाही मनोज काळे यांना पालिकेच्या धोरणात्मक विषयात आणि प्रशासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला? भांडारकर सारख्या जबाबदार अधिकाऱ्यांनी एका लोकप्रतिनिधीच्या पतीचे आदेश कोणत्या नियमाखाली मान्य केले, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महापौर दीपमाला काळे प्रतिसाद दिला नाही.