

जळगाव : राज्यातील महायुती सरकारवर आता विरोध करण्यासारखे काहीच उरलेले नाही, त्यामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते शांत झाले आहेत, अशी टीका भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ते धरणगाव तालुक्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने जळगाव येथील जीएम फाउंडेशन कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार सुरेश गोरे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख यांच्यासह गिरीश महाजन उपस्थित होते.
रोहित पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता महाजन म्हणाले, "सीआयडी किंवा ईडीची कारवाई झाली म्हणजे ते चुकीचेच आहेत असे नाही, परंतु कोणी भ्रष्टाचार केला असेल तरच अशा कारवाया होतात. त्यांनी काहीच केले नसेल तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही."
आज विरोधकांकडे सरकारवर टीका करण्यासारखे काहीच उरलेले नाही. काही नेते केवळ बोलायचे म्हणून बोलतात. त्यामुळेच अनेक नेते आता शांत झाले आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांतही अंतर्गत संघर्ष आहे – कुठे परिवार विरुद्ध कार्यकर्ते, तर कुठे नेतृत्वच कोलमडलेले आहे. पक्ष पुढे नेण्याची दिशा नाही.
गिरीश महाजन यांनी असेही सूचित केले की, जयंत पाटील सध्या स्वतःच्या पक्षात समाधानी नाहीत आणि ते नेहमीच संपर्कात असतात”, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश झाल्याचा आनंदही यावेळी व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.