

जळगाव : जळगावातील व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून जिल्हा पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
वाणी यांनी सांगितले की, आरोपी विनोद पंजाबराव देशमुख याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असतानाही आजपर्यंत त्यांना अटक झालेली नाही. उच्च न्यायालयाने २८ एप्रिल २०२५ रोजी अटक करण्याचे आदेश दिले असूनही आरोपी गावात मुक्तपणे फिरत असल्याचा असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत वाणी यांनी दस्तऐवज दाखवत सांगितले की, आरोपी स्वतःला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यकर्ता म्हणवत असून पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून दबाव आणत आहे. इतकेच नव्हे, तर “मी एसपींसोबत बसतो, अजितदादांसोबत उभा असतो, मला कोणी अटक करू शकत नाही” असे सांगून थेट कायद्यालाच आव्हान देत इच्छित असल्याचा आरोपही वाणी यांनी यावेळी केला.
वाणी यांनी म्हटले की, माझ्यावर दाखल झालेल्या प्रकरणांत पोलिसांनी तात्काळ अटक करून चार्जशीट दाखल केली. मात्र, देशमुखावरील दरोडा, फसवणूक, लैंगिक अत्याचार, कटकारस्थान यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत पोलिसांनी कारवाईत ढिलाई दाखवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असून, न्याय दिरंगाई म्हणजे न्याय नाकारणेच असल्याचा आरोप वाणी यांनी केला.
देशमुखाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, हे गंभीर असल्याचे वाणी म्हणाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आरोपीला अटक करावी, सर्व प्रकरणांचा निष्पक्ष तपास व्हावा, अर्जदार व कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी आणि न्यायालयीन आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा मागण्या वाणी यांनी पत्राद्वारे पत्रकार परिषदेत केल्या आहेत.