

जळगाव : शैक्षणिक प्रगतीसाठी चांगल्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालक सतत प्रयत्नशील असतात. यासाठी शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी पालक परीक्षा रिक्षा, व्हॅन, स्कूल बसचा वापर करतात. मात्र या प्रवासात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
भुसावळ येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेणारा एक विद्यार्थी रिक्षातून शाळेत जात असताना रिक्षातून खाली फेकला गेला. विशेष म्हणजे, रिक्षाचालकाला या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिस कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे.
भुसावळ शहरातील खाचणे हॉल परिसरात राहणारा चार वर्षांचा युग कुलकर्णी शनिवार (दि.12) रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी रिक्षामध्ये बसला होता. वळणावर रिक्षा घेत असताना अचानक रिक्षातून खाली फेकला गेला. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही, मात्र त्याला किरकोळ मार लागला आहे.
युगचे वडील प्रसाद कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रिक्षावाल्यांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षामध्ये बसवू नयेत. वाहतूक पोलिसांनीही अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करावी.”
आरटीओ विभाग तीन प्रवाशांच्या बसण्याची परवानगी असलेल्या रिक्षांमध्ये बिनधास्तपणे ८-१० विद्यार्थी बसवत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे.