

जळगाव : जळगाव शहरातील इंग्रजी माध्यम शाळेत शिकणाऱ्या दहावीतील लावण्या सोनवणे हिने डॉ. होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा तर खानदेशातून प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खानदेशातील दहा हजार विद्यार्थ्यांमध्ये लावण्याने अव्वल क्रमांक मिळवत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे.
या यशाबद्दल लावण्याचा गौरव मुंबई येथे ‘द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट’ पुरस्काराने करण्यात आला. विशेष म्हणजे, तिला इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) येथे चार दिवसांची भेट देण्याची आणि उपग्रह व अवकाश संशोधनाची माहिती मिळवण्याची संधीही मिळाली आहे. इस्रोमध्ये भेट देत वास्तव अनुभव घेण्याचा आनंद लावण्याने व्यक्त केला.
लावण्या ही सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या नरेश सोनवणे यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल तिच्या पालकांनीही अभिमान व्यक्त करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "लावण्या भविष्यात एक यशस्वी शास्त्रज्ञ व्हावी," अशी आशा तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.