kirit somaiya | मतदान याद्यांच्या सावळागोंधळावर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल: जळगावात भाजप कार्यकर्त्यांना थेट 'फिल्डवर' उतरण्याचे आदेश!

'सरकारी रिपोर्टिंगवर विसंबून स्वतःला फसवू नका; घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा!'
kirit somaiya
kirit somaiya
Published on
Updated on

जळगाव: "मतदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरांची नावे समाविष्ट केली जात असून, एकट्या मालेगावमधून २३ हजार ५८० बांगलादेशी मुस्लिमांची नावे वगळण्यात आली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाखांपेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारी बीएलओ (BLO) च्या अहवालांवर विसंबून स्वतःला फसवू नका. आपल्यावर ज्या बूथची जबाबदारी आहे, तिथे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मॅपिंग करा," असा थेट आणि आक्रमक इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दिला. जळगाव येथील भाजप कार्यालयात आयोजित बूथ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मालेगाव, मुंब्रा, सिल्लोडमध्ये 'व्होट बँक'चे मोठे आव्हान; मशिदींमधून फॉर्म वाटप!

किरीट सोमय्या यांनी राज्यातील विशिष्ट मतदारसंघांमधील मुस्लिम मतदारांच्या वाढत्या संख्येवर आणि मतदानाच्या पॅटर्नवर बोट ठेवले. ते म्हणाले: एकगठ्ठा मतदानाचा धोका: मालेगावमध्ये दीड लाख, मुंब्रा येथे दोन लाख आणि सिल्लोडमध्ये तीन लाख मुस्लिम मतदारांचे एकगठ्ठा व्होटिंगचे मोठे आव्हान आहे. यातील घुसखोर बांगलादेशींची नावे आपल्याला मतदार यादीतून वगळायची आहेत. धुळे आणि मालेगाव सारख्या भागात थेट मशिदींमध्ये बसून फॉर्मचे वाटप आणि ते भरून घेण्याचे काम सुरू आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

९९% स्लिप वाटपाचा दावा फोल!

प्रशासकीय यंत्रणेच्या दाव्यांवर सोमय्या यांनी जोरदार आक्षेप घेतला. "जळगावात प्रशासन ९९% मतदान स्लिप वाटप झाल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात २०% देखील काम झालेले नाही. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ५०% मॅपिंगसुद्धा पूर्ण झालेले नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना याच्याशी काही देणे-घेणे नाही, त्यांना एकाच वेळी ९९% घरे सापडणे शक्यच नाही. त्यामुळे बीएलओवर भरोसा न ठेवता, भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन फॉर्म भरून घ्यावेत," असे मार्गदर्शन त्यांनी केले. खुद्द भाजपच्या बीएलओ असलेल्या गीता परदेशी यांचाच फॉर्म गायब झाल्याचे उदाहरण देत त्यांनी या सावळागोंधळावर चपराक लगावली.

गुजरातप्रमाणे जळगाव मजबूत करा; खासदारांच्या पराभवाचा दाखला

गेल्या निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना सोमय्या यांनी थेट भाष्य केले. "गॅस गोडामुळे आपले भाजपचे खासदार विजय निकम यांचा पराभव झाला. निवडणूक काळात ज्या ताकदीने आपण काम करतो, त्याच पटीत आता एसआयआर (SIR) चे काम करावे लागेल. जर हे काम चोख झाले, तर पुढील २० वर्षे आपल्याला काम करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला जळगाव जिल्हा गुजरातसारखा भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनवायचा आहे."

मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट

राज्यामध्ये 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेला प्रचंड गती देण्याची गरज असून, या मोहिमेदरम्यान घरोघरी तपासणी होते की नाही, यावर कोणाचेही लक्ष नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या संपूर्ण ढिसाळ कारभाराविरोधात आणि मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी उद्याच (मंगळवारी) मुंबईत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. तसेच, स्थानिक आमदारांनीही हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news