जळगाव | जामनेरकरांना हिरा काय असतो हे माहिती आहे. म्हणूनच त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला एक हिरा दिला आहे. तो म्हणजे राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) होय असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते, जामनेर येथे झालेल्या शिवसृष्टी व भीमसृष्टी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. यावेळेस बोलताना फडणवीस म्हणाले, माझा या ठिकाणी येण्याचा एकच स्वार्थ आहे, जामनेरकरांकडून एक शब्द घ्यायचा आहे की, फॉर्म भरल्यानंतर महाजन संपूर्ण महाराष्ट्र फिरतील पण निवडणुकीच्या दिवशी येतील असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामनेरकरांकडून सोडवून घेतला.
जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टीच्या उद्घाटन कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ना. गिरीश महाजन, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार राजू मामा भोळे, खा. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पावसाचे वातावरण झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला जाण्याचे असल्याने त्यांनी स्वागत कार्यक्रमानंतर थेट माईक हातामध्ये घेत भाषणाला सुरुवात केली व ते म्हणाले की स्वातंत्र्य काय असते स्वराज्य काय असते स्वाभिमान काय असतो हे दाखवण्यासाठी ही शिवसृष्टी तयार झाली तर ज्यांनी समता बंधुत्व शिकवले. जगातील सर्वोत्तम संविधान आम्हाला दिले त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा पुतळा येथे तयार झालेला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले गिरीश महाजन यांच्या पेक्षा एकच व्यक्ती अशी आहे की जी जामनेरमध्ये जास्त मते घेऊ शकते ती म्हणजे साधना वहिनी आहे. पण या वेळेस गिरीश महाजन निवडणूक लढतील मात्र 2029 च्या निवडणुकीला साधना वहिनी (गिरीश महाजन यांच्या पत्नी) या निवडणूक लढतील अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमचा शब्द घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे की गिरीश महाजन हे फक्त फॉर्म भरायला या ठिकाणी राहतील त्यानंतर अख्खा महाराष्ट्र फिरतील व निवडणुकीच्या दिवशी या ठिकाणी येतील हे तुम्हाला मंजूर आहेत का असे त्यांनी विचारले. तर दुसरीकडे त्यांनी जामनेरकरांना धन्यवाद देत तुम्हाला हिरा काय असतो हे माहित आहे. जामनेरकरांना हिऱ्याची खरी पारक आहेत ते खरे जोहरी आहेत असे म्हणत ते म्हणाले की जामनेरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राला एक हिरा गिरीश महाजन यांच्या रूपाने दिलेला आहे.