

जळगाव : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये डी सेक्टर मधील चटई बनविणाऱ्या कंपनीला रविवार (दि.29) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कंपनी जळून खाक झाली आहे. आग कशी लागली याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये सुद्धा एमआयडीसीतील आशीर्वाद पॉलिमर्स या चटई निर्मिती कारखान्याला आग लागून सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी देखील आग लागल्याचे कारण समोर आले नाही. (MIDC Massive Fire Breaks Out in Plastic Mat Making Company )
जळगाव एमआयडीसी मध्ये डी सेक्टर मध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज ही चटई उत्पादन करणारी फॅक्टरी आहे. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास या फॅक्टरीतील एका भागाला आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. यातच येथील एका रूम मध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अजून जास्त प्रमाणात पसरली.
दरम्यान आगीचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. महापालिका व जैन इरिगेशन येथील अग्निशामक बंब तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र ही आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच वेळ लागला. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक बंबांनी आग विझवण्याचे काम सुरू होते. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.