

जळगाव : जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची 18 मार्च रोजी औरंगाबाद येथे नगरपालिका विभाग अधीक्षक अभियंता म्हणून बदली करण्यात आली. मात्र, आठ दिवस उलटूनही त्यांना जळगावच्या पदभाराचा कोणालाही ताबा दिलेला नाही. परिणामी, मार्च महिना संपण्यास अवघे सहा दिवस बाकी असताना प्रलंबित कामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात प्रशांत सोनवणे यांची बदली झालेली होती, मात्र त्यांनी मुंबईत धाव घेऊन ती रद्द करून घेतली आणि पुन्हा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांना औरंगाबाद येथे हजर राहण्याचे आदेश होते. तरी देखील, त्यांनी औरंगाबादच्या पदभाराची जबाबदारी स्वीकारली नसून जळगावच्या पदभारासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, ते कुठे आहेत याची माहिती प्रशासनाकडे नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन प्रमुखांशी संपर्क साधला असता, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांनी कोणालाही पदभार दिलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्यांनी रजा टाकली आहे की नाही, याची कोणतीही माहिती विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
सुनिल ठाकूर, सार्वजनिक बांधकाम,ओएस, जळगाव
जिल्हा प्रशासन मार्च महिन्याच्या अखेरीस निधी योग्य प्रकारे वापरण्यासाठी प्रयत्नशील असताना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी वाढल्या आहेत. अनेक विकासकामे रखडली असून ठेकेदारांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.