

जळगाव : नरेंद्र पाटील
जळगाव जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्याकडे दुर्लक्ष करून बदल्यांच्या राजकारणावर अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
भुसावळ येथील जीवनयात्रा संपवल्याची घटना, जळगाव शहरात गावठी कट्ट्यातून सुटलेली गोळी आणि वरणगाव येथे गावठी कट्टा सापडण्याच्या घटना हे स्पष्ट दाखवते की जिल्ह्यात गावठी शस्त्रे सहजपणे मिळत आहेत. मात्र, पोलीस प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे, एका ट्रॅव्हल चालकाकडे गावठी कट्टा सापडला असून तो दोन राज्यांच्या सीमेवरून प्रवास करून आला होता. या दरम्यान, त्याच्या वाहनात कट्टा हाताळताना गोळी सुटून एक युवक जखमी झाला. तर वरणगावसारख्या संवेदनशील ठिकाणी गावठी शस्त्र सापडणे ही गंभीर बाब आहे.
परंतु या गंभीर घटनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांचे लक्ष बदल्यांकडे लागले आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी अधिकाऱ्यांना मात्र बदलीची चाहूल लागली आहे. इच्छुक ठिकाणी नियुक्तीसाठी अनेकजण स्वतःच्या पातळीवर प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
सध्या रावेर, भुसावळ आणि जळगाव येथील पोलीस ठाण्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदासाठी चुरस लागली आहे. या स्पर्धेत कोण ‘बाजी’ मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही अधिकारी नागपूर, जामनेर, पारधी, अमळनेर व मुंबईतील ‘स्रोतां’च्या आधारे आपली उमेदवारी पक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीचा फैलाव आणि पोलीस यंत्रणेच्या बदल्यांकडे वाढता कल ही चिंतेची बाब बनली आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा बाजूला राहून "कोण कुठे बसतो" याचं राजकारण अधिक चर्चेचा विषय ठरू लागलं आहे.