

Jalgaon District Central Cooperative Bank
जळगाव : शेतकरी जीवनयात्रा संपवल्याच्या घटनांनी जिल्हा हादरलेला असताना जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी काजू-बदाम, पिस्ते व फळांचा नाश्ता देण्यात आल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
माहितीनुसार, सहकार मंत्री अमित शहा यांच्या नियंत्रणाखालील सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार वर्मा हे जळगावला आले होते. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील कार्यक्रमानंतर त्यांनी जिल्हा बँकेला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपनिबंधक गौतम बलसाने, नाबार्डचे अधिकारी तायडे तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी डोहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेच्या कामकाजाचा आढावा घेताना शेतकऱ्यांच्या विविध समस्या, भविष्यातील अडचणी यांवर चर्चा झाली. मात्र या अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी फळे व ड्रायफ्रूट्सचा नाश्ता देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत 128 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्या आहेत. त्यापैकी केवळ 59 प्रकरणांना शासनाची मदत मंजूर झाली असून 45 प्रकरणे अपात्र ठरली, तर 24 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत बँकेत मेजवानीसारखा नाश्ता दिल्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संदर्भात जिल्हा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जितेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले की, ही भेट नव्हती. आम्ही त्यांना जिल्हा बँकेत आमंत्रित केले होते. यावेळी जिल्हा बँकेच्या समस्या आणि मागण्या मांडण्यात आल्या.