

जळगाव : भुसावळचे सुपुत्र आणि युवा लेखक प्रवीण नायसे यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन समारंभासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या निमंत्रणामुळे भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रवीण नायसे यांची निवड पंतप्रधान युवा मेंटारशिप योजनेअंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत करण्यात आली होती. महाराष्ट्रातून फक्त चार युवकांची या योजनेसाठी निवड झाली होती, त्यामध्ये नायसे यांचा समावेश होता.
त्यांनी लिहिलेले "आद्यक्रांतीवीर उमाजी राजे नाईक" हे पुस्तक २०२३ मध्ये राष्ट्रपती भवनात प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे भारत सरकारतर्फे देशातील प्रमुख भाषांमध्ये भाषांतरही करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिन समारंभासाठी दिल्लीहून मिळालेले सरकारी निमंत्रण हा केवळ प्रवीण नायसे यांचा गौरव नसून, संपूर्ण भुसावळ आणि जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बाब आहे.