

जळगाव : भुसावळ तालुक्यात मोंढाळा, वेल्हाळा, खंडाळा, साळशिंगी व जुनाने हे तलाव आहेत. या तलावांमध्ये 2023 मध्ये वेल्हाळा तलाव सोडल्यास कोणत्याही तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नव्हता. मात्र 2024 मध्ये वेल्हाळा, साळशिंगी व मुंडळा या तलावांमधून शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आलेले आहे.
भुसावळ तालुक्यामध्ये मोंढाळा, वेल्हाळा, खंडाळा, साळशिंगी व जुनाने ही पाच तलावे आहेत. या तलावांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यात येते. त्याचा शेतकऱ्यांना आवर्तनासाठी चांगला फायदा होतो. गावातील गुरेढोरांसाठी ज्या शेतकऱ्यांनी पंपाद्वारे पाण्याची मागणी केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 2023 मध्ये वेल्हाळा हा एकमेव तलाव असा होता की, या तलावामध्ये 30 डिसेंबर 2024 अखेर 74.1 टक्के पाणी होते. या तलावामध्ये 1.476 जिवंत पाणीसाठा होता. मोंढाळा, खंडाळा, साळशिंगी व जुनाने या तलावांमध्ये निरंक पाणीसाठा होता, मात्र आता अशी स्थिती राहीली नाही.
2024 मध्ये भुसावळ तालुक्यातील मोंढाळा, वेल्हाळा, खंडाळा, साळशिंगी, जुनाने या तलावांमध्ये आता मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मोंढाळा तलावात 84.38 टक्के, वेल्हाळे तलावात 96.23 टक्के, खंडाळा तलावात 73.53 टक्के, साळसिंगी तलावात 84.45 टक्के, जुनाने तलावात 49.81 टक्के पाणीसाठा आहे. या तालुक्यातील वेल्हाळा, साळशिंगी व मोंढाळा या तलावांमधून शेतकऱ्यांना नुकतेच पहिले आवर्तन सोडण्यात आलेले आहे
तालुक्यातील वेल्हाळा हा तलाव सोडल्यास बाकी चार तलावांमध्ये पाणीसाठा हा नेहमीच शंभर टक्के किंवा त्याच्या जवळपास असेलच असे नसते. वेल्हाळा मध्ये सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील तलावामध्ये पाणीसाठा उपलब्ध होत असतो. इतर तलावांमध्ये ज्या माध्यमातून पाणी तलावांमध्ये येते असे बरेचसे माध्यम बंद झालेले आहेत.
भविष्यात येथील तलावांची योग्य ती काळजी घेण्यात आली तरच मोंढाळा, खंडाळा, साळशिंगी व जुनाने तसेच वेल्हाळा या तलावांच्या आजूबाजूला असलेल्या गावातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊन कोरडवाहू शेती ही पाण्याखाली येईल. मात्र या तलावांमधून काहीच महिने पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पीक घेण्यामध्ये अडचणी येतात. केंद्रीय मंत्रीपद पटकावणाऱ्या जळगाव, भुसावळ मध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचे लवकरच निरसन होईल अशी आशा नागरिक करत आहेत.